मुख्य बातमी

मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या सातजणांचा सत्कार

रत्नागिरी : भाट्ये ते मांडवी दरम्यानच्या समुद्रामध्ये अचानक आलेल्या अजस्त्र लाटांमुळे जुवेब हुश्ये यांची फिशिंग बोट समुद्रात उलटून मोठा अनर्थ ओढवला होता. मात्र, अत्यंत बिकट परिस्थितीतही राजिवड्यातील मच्छीमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे ७ जणांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या धाडसी कामगिरीबद्दल या सर्व जीवरक्षक मच्छिमारांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.

भाट्ये ते मांडवी दरम्यान समुद्रात मासेमारी सुरू असताना अचानक आलेल्या अजस्त्र लाटांचा जोरदार तडाखा बसल्याने जुवेब हुश्ये यांची फिशिंग बोट पलटी झाली. या दुर्दैवी प्रसंगात बोटवरील मच्छिमार संकटात सापडले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखत राजिवडामधील मच्छिमार धावून आले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे राजिवड्यातील मच्छिमार व सामाजिक कार्यकर्ते अजमल उर्फ अज्जु हुनेरकर आणि खालिद होडेकर यांच्या ‘सुरैय्या’ बोटवरील तसेच रजिन हुनेरकर यांच्या ‘अनाबिया’ बोटवरील मच्छिमार बांधवांनी जीवाचा जोखीम पत्करून मोठी मोहीम राबवली.

‘सुरैय्या’ बोटवरील अजमल (अज्जु) हुनेरकर, खालिद होडेकर, कैफ होडेकर, यास्मिन पावसकर, माई पाटील, अफान वस्ता, खालिद मजगावकर तसेच ‘अनाबिया’ बोटवरील शहबाज वस्ता व अरमान हुनेरकर यांनी अत्यंत कष्टाने आणि धाडसाने सातही जणांचे प्राण वाचवले. त्यांच्या या अतुलनीय साहसाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

समुद्रात धाडस दाखवून मानवी जीव वाचवणाऱ्या या सर्व मच्छिमार बांधवांचा नगरसेवक अमित विलणकर, मुकुंद विलणकर, साई खेऊर आणि फैयाज हुनेरकर यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ प्रदान केला व गौरव केला. संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देणाऱ्या या धाडसी तरुणांच्या पाठीवर परिसरातून कौतुकाची थाप दिली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!