मुख्य बातमी

रत्नागिरीत २३ सप्टेंबरला ‘शरद संपात’

दिवस-रात्र होणार समान : सूर्य उगवणार अचूक पूर्वेला

रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २३ सप्टेंबरला ‘शरद संपात’ किंवा ‘विषुव दिन’ असणार आहे. दरवर्षी २२/२३ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर दिवस आणि रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे समान असतात. खगोलशास्त्रामध्ये या विशेष दिवसाला ‘शरद संपात’ किंवा ‘विषुव दिन’ असे म्हटले जाते.

पृथ्वीचा आस २३.५ अंशाने कललेला असतो, मात्र या दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो. दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असल्याने दिवस व रात्रीचा कालावधी समान होतो.

या खगोलीय घटनेचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी सूर्य बरोबर अचूक पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यामुळे रत्नागिरीतील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या दिवशी सूर्योदयाच्या वेळी निरीक्षण करून आपल्या घराची व परिसराची अचूक पूर्व दिशा निश्चित करावी. याशिवाय, या दिवशी माध्यान्हाच्या (दुपारच्या) वेळी जमिनीवर लावलेल्या एका सरळ काठीच्या सावलीची लांबी मोजून नागरिक आणि विद्यार्थी आपल्या स्थानाचे अक्षांश देखील सहजपणे काढू शकतात, असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे.

खगोलशास्त्रीय गणितानुसार या दिवशी दिवस-रात्र समान मानले जात असले, तरी प्रत्यक्षात सूर्याच्या गोलाकार आकारामुळे आणि पृथ्वीच्या वातावरणातील प्रकाशाच्या अपवर्तनामुळे सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच त्याचा प्रकाश दिसू लागतो आणि मावळल्यानंतरही काही वेळ राहतो. यामुळे या दिवशी दृश्य प्रकाश १२ तासांपेक्षा काही मिनिटे जास्त असतो. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष प्रकाशाचा आणि अंधाराचा कालावधी तंतोतंत समान म्हणजे १२-१२ तासांचा असतो, त्याला ‘प्रत्यक्ष समप्रकाश दिन’ असे म्हणतात. हा प्रत्यक्ष समप्रकाश दिन भौगोलिक स्थानानुसार विषुव दिनाच्या काही दिवस आधी किंवा नंतर अनुभवता येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!