महाराष्ट्रमुख्य बातमी

संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकविमा, एनडीआरएफ व शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवा : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

नवी मुंबई : कोकणातील पावसाच्या खंडामुळे भात, नाचणीसह खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी केवळ आकडेवारीच्या आधारे परिस्थितीचे मूल्यांकन न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी. पीकविमा, एनडीआरएफ आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक सक्रियपणे काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

सीबीडी बेलापूर येथील सिडको सभागृहात कोकण विभागातील पीक परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत कृषिमंत्री श्री.भरणे बोलत होते. बैठकीस फलोत्पादन,रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले,मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती रायगड वैकुंठ पाटील, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल विभागीय कृषी सहसंचालक बालाजी ताटे, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृष्य प्रणालीद्वारे आमदार निलेश राणे, आमदार शेखर निकम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. भरणे म्हणाले, प्रत्येक शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित शेतीशी जोडलेले आहे, ही बाब लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी. महसूल, कृषी आणि संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार नुकसानीचे पंचनामे व क्षेत्रीय स्तरावरील वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याची कार्यवाही तातडीने करावी. पिकांची प्रत्यक्ष स्थिती, पावसातील खंड आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम याची अचूक नोंद करून पुढील मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग आणि त्यासंबंधीची कार्यवाही पीक परिस्थितीनुसार तातडीने पूर्ण करावी. पीकविम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणारी मदत वेळेत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. शासकीय योजनांची माहिती प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पिकांच्या नुकसानीसोबतच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. आवश्यक त्या भागात पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी मांडल्या. पिकांचे नुकसान, पावसातील खंड, पीकविमा, नुकसानभरपाईचे निकष आणि शासनाच्या विविध योजनांच्या लाभाबाबत केलेल्या सुचनांची, त्यांनी मांडलेल्या क्षेत्रीय समस्यांची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी, अशा सुचनाही कृषिमंत्री श्री. भरणे यांनी यावेळी दिल्या.

कोकण विभागातील पिकांच्या नुकसानीची अधिकाधिक मदत द्यावी : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून जिल्ह्यातील पिकांच पंचनामे करण्यात यावेत. आंबा व काजू पिकांचे यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यंदाची एकूण पीक परिस्थितीही गंभीर आहे. त्यामुळे कोकणाची भौगोलिक व कृषी परिस्थिती लक्षात घेऊन नुकसानभरपाईचे निकष स्वतंत्रपणे विचारात घेऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत उपलब्ध करून द्यावी. सिंधुदुर्गातील नुकसानीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून मदतीचा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

पंचनामे करताना वस्तुस्थितीची अचूक नोंद करा : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

फलोत्पादन, रोजगार हमी योजना मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले,कोकणातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून अचूक नोंद करावी. पंचनाम्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये, अशी स्पष्ट सूचनाीर त्यांनी यावेळी केली. महसूल, कृषी विभागातील तालुका व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी. कोकणातील बहुतांश शेतकऱ्यांकडे लहान भूधारणा असून त्यांची शेतीची परिस्थिती इतर भागांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन पंचनामे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणातील भात पिकावर पावसातील खंडाचा परिणाम झाल्याचे सांगताना पालकमंत्री श्री. गोगावले यांनी उशिरा सुरू झालेला पाऊस, पिकांसाठी आवश्यक पाण्याची कमतरता, पिकांची पाने पिवळी पडणे तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव याकडे लक्ष वेधले. आंबा-काजू या नगदी पिकांचे यापूर्वी झालेले नुकसान आणि यंदाची परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातील पीक परिस्थितीचा स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून पावसाचे प्रमाण नव्हे, तर पिकांच्या गरजेच्या काळातील पाऊस व प्रत्यक्ष पीकस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेत ट्रिगर तपासून कार्यवाही करावी आणि त्यासंदर्भातील प्रस्ताव तीन दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत सादर करावेत. पीक परिस्थितीनुसार पीक कापणी प्रयोगांचे वेळापत्रक निश्चित करून ते तातडीने पूर्ण करावेत.

बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आपापल्या जिल्ह्यातील पीक परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. पर्जन्यमान, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, पिकांवरील परिणाम, संभाव्य नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबतची माहिती यावेळी मांडण्यात आली.

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना, कोकण विभागातील पीक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!