अजिवलीत लोंबकळणाऱ्या वीजवाहिनीचा धक्का; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
महावितरणच्या हलगर्जीपणाचा ग्रामस्थांचा आरोप

राजापूर : तालुक्यातील अजिवली येथे शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा महावितरणची लोंबकळणारी जिवंत विद्युत तार अंगावर पडल्याने विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. जयवंत राणे (४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत राणे हे रविवारी सायंकाळी अजिवली येथील शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी गवतात पडलेल्या महावितरणच्या जिवंत विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सरपंच संजय राणे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जयवंत राणे यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरपंच संजय राणे यांनी पाचल येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने अधिकारी घटनास्थळी पाठविण्याची मागणी केली. मात्र, रात्री पावणेदहापर्यंत पाचल किंवा राजापूर येथील महावितरणचा जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
जयवंत राणे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. राणे हे गरीब कुटुंबातील असून शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधार हिरावला असून शासनाने अथवा महावितरणने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील, पोलीस अंमलदार कोळी तसेच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रात्री पावणेदहाच्या सुमारास महावितरणचे राजापूर उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सल्ल्यानुसार जयवंत राणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
महावितरणच्या विद्युत तारांच्या देखभाल-दुरुस्तीतील कथित हलगर्जीपणामुळे जयवंत राणे यांचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.



