गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हा संस्थेला पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून, रत्नागिरी जिल्ह्यात गडकिल्ले संवर्धन मोहीम राबवून केलेल्या विशेष कार्याबद्दल गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. संस्थेच्या निःस्वार्थ गडसंवर्धन कार्याची दखल घेत, पर्यटन सहकारी सेवा संस्था – समूह मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या वतीने संजय यादवराव आणि राजू भाटलेकर यांच्या हस्ते “पर्यटन मित्र पुरस्कार २०२६” देऊन गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी संस्थेचा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा किंवा काही मोजक्या कार्यकर्त्यांचा नसून, तो संस्थेत कार्यरत असलेल्या प्रत्येक मावळ्याचा आणि रणरागिणीचा आहे. गड-किल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन, इतिहासाचा अभ्यास आणि पुढील पिढीपर्यंत आपल्या दुर्गवैभवाची जपणूक करण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीची ही पोचपावती आहे. संस्थेच्या वतीने तन्मय जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.



