मुख्य बातमी

चिपळूणच्या दुष्काळ निकषांपासून निवडणूक प्रक्रियेपर्यंत निःपक्ष चौकशी करावी : ठाकरे गटाचे प्रशासनाला निवेदन

दुष्काळाची फेरपडताळणी, ‘हळद्या’ प्रादुर्भावाचे शास्त्रीय निदान आणि निवडणूक प्रक्रियेतील मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश का झाला नाही, भातपिकावरील ‘हळद्या’ प्रादुर्भावाचे कारण काय आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण तालुका शाखेने प्रशासनाकडे दोन स्वतंत्र निवेदने सादर केली.

तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांच्या नेतृत्वाखाली ही निवेदने नायब तहसीलदार तसेच प्रभारी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदारांकडे देण्यात आली. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव (बाळा) कदम उपस्थित होते.

दुष्काळ निर्धारणासाठी वापरण्यात आलेले पर्जन्यमान, पर्जन्यखंड, पीकस्थिती, जमिनीतील ओलावा व अन्य निकषांचा अधिकृत अहवाल उपलब्ध करून द्यावा. तसेच महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे गावनिहाय फेरपडताळणी करून प्रत्यक्ष पीकस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि पीकनुकसानीचे मूल्यांकन करावे, अशी मागणी करण्यात आली.

कृषी विभागाकडे दिलेल्या निवेदनात ‘हळद्या’ प्रादुर्भावाची प्रत्यक्ष पाहणी करून बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण, नमुने तपासणी आणि कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून शास्त्रीय निदान करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यांबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा संदर्भ देत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. संबंधित निर्णयप्रक्रिया आणि त्यामागील कारणमीमांसा पारदर्शकपणे जनतेसमोर आणावी, अशी मागणी पक्षाने केली.

यावेळी सचिन कदम, पार्थ जागुष्टे, तीर्था लाड, सचिन चोरगे, सचिन शेट्ये, संदीप राणे, संजय रेडीज, मनोज पांचाळ, राजू विखारे, अजित गुजर, सुरेंद्र शिंदे, संदीप चव्हाण, दीपक कदम तसेच गंगाराम पवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!