मुख्य बातमी

‘उल्लास’ अभियानांतर्गत २५ ऑक्टोबरला पायाभूत साक्षरता मूल्यमापन चाचणी

राज्यभरातून ७ लाख परीक्षार्थी सहभागी होण्याची शक्यता; शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची सुवर्णसंधी

रत्नागिरी : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत’ राज्यातील असाक्षर व्यक्तींसाठी २५ ऑक्टोबर रोजी ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी’ (FLNAT) आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही परीक्षा होणार असून, राज्यभरातून सुमारे ७ लाख परीक्षार्थी यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. ‘उल्लासमय दिवाळी, साक्षर महाराष्ट्राची वाटचाल’ या संकल्पनेतून नवसाक्षरांनी या चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना) तथा राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाने केले आहे.

परीक्षेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये :

पात्रता : १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नोंदणीकृत व्यक्तींना ही परीक्षा देता येईल.

भाषा पर्याय : परीक्षा देण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा एकूण ९ भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

गुणविभागणी व वेळ : चाचणी एकूण १५० गुणांची असेल. यामध्ये वाचन (५० गुण), लेखन (५० गुण) आणि संख्याज्ञान (५० गुण) अशी विभागणी करण्यात आली आहे. परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असून, दिव्यांग परीक्षार्थींसाठी ६० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.

परीक्षा केंद्र व ओळखपत्र : ज्या शाळांमध्ये असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, त्याच शाळांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी येताना अधिकृत ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा बँक पासबुक) सोबत आणणे अनिवार्य आहे.

मूल्यांकन व पुढील शिक्षणाची संधी :

परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांची तपासणी शाळा स्तरावरच करण्यात येणार असून, गुण ‘उल्लास’ पोर्टलवर ऑनलाइन भरले जातील. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना NIOS किंवा SIOS च्या माध्यमातून इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी व बारावीच्या समकक्ष परीक्षा देऊन पुढील शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होता येणार आहे.

या परीक्षेच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी शिक्षण संचालक (योजना) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राज्यातील जास्तीत जास्त नवसाक्षरांनी जवळच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून नोंदणी करावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!