आरोग्यमुख्य बातमी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आयोडीनयुक्त मिठाच्या वापराबाबत जनजागृती

रत्नागिरी : आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार व आयोडीनयुक्त मिठाचा वापर याबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून २१ ऑक्टोबर हा जागतिक आयोडीन न्युनता विकार प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात १४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य केंद्र, गाव, शाळा, महाविद्यालय येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोडीन हा शरीरासाठी लहान पण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. देशातील अनेक भागांमध्ये जमिनीतील आयोडीन कमी असल्याने लोकांमध्ये त्याची कमतरता आढळते. त्यामुळे प्रत्येकाने दररोजच्या आहारात आयोडीनयुक्त मीठाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. आयोडीन हा शरीरासाठी अत्यावश्यक घटक असून तो थायरॉइड ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या थायरॉइड हॉर्मोन्स (T₃ आणि T₄) निर्मितीसाठी आवश्यक आहे. हे हॉर्मोन्स शरीरातील वाढ, विकास आणि चयापचयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.आयोडीनची कमतरता झाल्यास गलगंड, मानसिक दुर्बलता, वाढ खुंटणे, तसेच गर्भधारणेदरम्यान भ्रूणविकासावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः बाल्यावस्था, पौगंडावस्था, गर्भधारणा आणि प्रसूतीच्या काळात (म्हणजे मातांच्या दुधासाठी) आयोडीनची गरज अधिक असते. या काळात आयोडीनच्या कमतरतेमुळे बाळाचा मेंदू, शरीरविकास आणि बुद्धिमत्ता यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आयोडीनची कमतरता असल्यास मातांना गर्भपात, मृतजन्म किंवा बौद्धिक दृष्ट्या दुर्बल मूल जन्माला येण्याचा धोका वाढतो.

वयोगटानुसार दररोज आवश्यक आयोडीनचे प्रमाण-० ते ११ महिने- 50 मायक्रोग्रॅम. १ ते ५ वर्षे- ९० मायक्रोग्रॅम, ६ ते १२ वर्षे- १२० मायक्रोग्रॅम. प्रौढ व्यक्ती- १५० मायक्रोग्रॅम, गर्भवती स्त्रिया- २०० मायक्रोग्रॅम इतके आवश्यक आहे.

आपण दररोज आहारामध्ये आयोडीनयुक्त मिठाचा वापर केला तर गलगंड, मानसिक दुर्बलता, वाढ खुंटणे यासारख्या आजारापासून संरक्षण मिळते. एकूणच आयोडीनयुक्त मीठामुळे अ‍ॅलर्जी किंवा गलगंड होत नाही. उलट त्याचा नियमित वापर या आजारांपासून बचाव करतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात फक्त आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा ,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!