जि. प. पूर्णगड शाळेत विद्यार्थी गुणगौरव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ शाळेत वार्षिक गुणगौरव समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. अभ्यास, कला, क्रीडा, विविध स्पर्धा, सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा, विविध कलागुण यामध्ये यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलन यामध्ये मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी ढोल वादन, विविध पारंपारिक गाणी, नाट्यछटा, कोकणची कला नमन, एकपात्री, रेकॉर्ड डान्स यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाला गावखडी गणाच्या पंचायत समिती सदस्या स्वाती शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती तारये व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत पूर्णगड, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, सर्व पालक, मित्रमंडळी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाविषयी पावस बीट शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती हिरवे तसेच परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

