मुख्य बातमी

हातखंबा बौद्धवाडी अश्रूंनी दाटली

पांगरी अपघातातील मृत तरुणांना अखेरचा निरोप

रत्नागिरी : देवरुख बावनदी मार्गावरील पांगरी येथील भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोघांवर सोमवारी (२७ एप्रिल) हातखंबा बौद्धवाडी येथील दफनभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन तरुणांच्या जाण्याने बौद्धवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अखेरच्या निरोपाच्या वेळी ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. एकाच क्षणात दोन घरांचे दिवे मालवले गेल्याने बौद्धवाडीवर दुःखाची दाट छाया पसरली आहे.

अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह अंत्यसंस्कारापूर्वी बौद्धवाडी येथील बुद्धविहार परिसरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांत, भावनिक वातावरणात प्रत्येक जण अश्रुपूर्ण डोळ्यांनी आपल्या लाडक्या मुलांना अखेरचा निरोप देत होता. अनेकांच्या हुंदक्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. यानंतर दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास दोघांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी दोन तरुणांच्या पार्थिवावर अंतिम विधी होत असल्याने वातावरण अधिकच भारावून गेले होते. कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांच्या हृदयाला पिळ बसत होता.

पांगरी येथील धोकादायक वळणावर २६ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. लग्न सोहळ्यासारख्या आनंदाच्या प्रसंगातून परतताना घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. हातखंबा बौद्धवाडीने एकाच वेळी दोन तरुण गमावल्याची वेदना प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजली आहे. बौद्धवाडीच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाची हृदयद्रावक घटना घडल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अंत्यदर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. शब्द अपुरे पडत असताना, नुसतीच शांतता आणि वेदना वातावरणात दाटून राहिली होती. या दुर्दैवी घटनेने हातखंबा गाव शोकसागरात बुडाले असून, या दोघांच्या आठवणींनी नागरिकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. अशा प्रकारची शोकांतिका यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याने नागरिकांना अजूनही अविश्वास आणि सुन्नता पसरलेली आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक ओळखीच्या चेहऱ्यावर या घटनेची वेदना स्पष्टपणे उमटत आहे.

तीन चिमुकल्या लेकरांचा आधार हरपला

सुमित विलास कांबळे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात तीन लहान मुली, पत्नी, एक सख्खा भाऊ तसेच दोन चुलत भाऊ असा परिवार आहे. वडिलांच्या छत्रछायेशिवाय राहिलेल्या या चिमुकल्या मुलींचे भविष्य आणि त्यांच्या डोळ्यांतील निरागस प्रश्न पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जाते. कुटुंबाचा आधारवड हरपल्याची जाणीव त्यांच्या घरात असह्य वेदना निर्माण करून गेली आहे. तर विकास कांबळे यांच्या निधनाने त्यांच्या पत्नीवर दुःखाचा आघात झाला आहे. आयुष्याच्या वाटचालीत सोबत देणारा जीवनसाथी अचानक निघून गेल्याने त्यांच्या संसाराचे चक्रच थांबले आहे. या दोन्ही कुटुंबांवर ओढवलेली ही शोकांतिका शब्दांच्या पलीकडची असून, संपूर्ण बौद्धवाडी या दुःखात सहभागी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!