मुख्य बातमी

पेड्रोल, डीझेल दरवाढीविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भार पडत असून केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर काँग्रेस शहर अध्यक्ष अशपाक काद्री, नंदा गांगण, असलम शेख, पांडुरंग कवितके आदी कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८ रुपयांची वाढ झाली असून यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत पेट्रोलियम उत्पादनांवरील करांमधून मोठ्या प्रमाणावर महसूल जमा केला असून त्याचा भार सामान्य नागरिकांवर पडत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींचा परिणाम केवळ वाहतूक क्षेत्रावरच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही होत आहे. त्यामुळे महागाई वाढून सर्वसामान्यांचे जीवन अधिक कठीण बनत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकामांवर परिणाम होत असल्याचे सांगत पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा तसेच इंधनाचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!