मुख्य बातमी

पालीनजीक ट्रेलर-कारच्या अपघातात चारजण जखमी

पाली : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर व कार यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील चौघेजण गंभीर जखमी होऊन वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात १६ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान झाला.

या अपघाताबाबत पाली पोलीस दूर क्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, १६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर खानू गावादरम्यान रत्नागिरी ते करंजारी असे जात असताना पटेल सॉ-मिल समोरील रस्त्यावरचालक कांतीलाल सासिया मिना (रा. साबळा ता. साबळा, जि. डंगरपूर, राजस्थान सध्या रा. देवळेफाटा, संगमेश्वर) याने आपल्या ताब्यातील ट्रेलर (क्र. आरजे २७ जीडी ३५८७) रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता ट्रेलर हयगयीने, बेदरकारपणे मागे घेताना कोणत्याही प्रकारचा सिग्नल न देता चालवित आणला. यावेळी त्याने ओमनी (क्र. एमएच ०७ एच ००२१) गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील शोएब अख्तर मजीमुल्ला खान (वय २४), मजिमुल्ला खान, जिक्रुनिसा मजिमुल्ला खान (४५), सानिया मजिमुल्ला खान (१६, सर्व रा. करंजारी, ता. संगमेश्वर) हे जखमी होऊन वाहनांमध्येच अडकून पडले होते. त्यांना तात्काळ स्थानिकांनी वाहनातून बाहेर काढून पाली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे हलवण्यात आले.

या अपघाताची खबर शोएब अख्तर मजीमुल्ला खान यांनी दिल्यावरून अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली असून अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राच्या महिला हेड कॉन्स्टेबल तृप्ती सावंतदेसाई करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!