मुख्य बातमी

रत्नागिरीत साडेसात हजार कोटी गुंतवणुकीतून ‘ग्रीन स्टील’; सी-प्लेन आणि सीएनजी प्रकल्पांना गती : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. बैठकीला आमदार किरण सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निबे इडिया लिमिटेडचे संचालक गणेश निबे, एआयआयएफए चे संचालक योगेश मंदानी, व्ही आय टी सेमिकाॕन्स पार्क लि चे संचालक ईश्वर्या कन्नन आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, या बैठकीत जिल्ह्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, संरक्षण क्षेत्र, पर्यटन आणि हरित ऊर्जेवर (Green Energy) विशेष भर देण्यात आला आहे.

७,५०० कोटींची गुंतवणूक आणि ग्रीन स्टील प्रकल्प: जिल्ह्यात स्टील उद्योगाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होणार आहे. सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातील एक प्रकल्प राजापूर येथे, तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पर्यटनासाठी ‘सी-प्लेन’ सेवा: रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आगामी वर्षभरात ‘सी-प्लेन’ (Sea Plane) सेवा संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे.

संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्प जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वाटद किंवा या परिसरामध्ये ‘ शिपयार्ड’ सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

सीएनजी प्रकल्प (CNG Project): रत्नागिरीतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा सीएनजी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.

व्हीआयटी सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत पूर्वी नियोजित असलेल्या ३८ हजार कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला अमेरिकेतील काही घडामोडींमुळे विलंब झाला असून, त्याचे मूल्य काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला जितकी जागा आवश्यक आहे, तितकीच देऊन उर्वरित अतिरिक्त जागा इतर नवीन उद्योगांसाठी वापरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!