खाऊच्या पैशातून विद्यार्थी बचत बॅंक; कोळवली भुवडवाडी शाळेचा अभिनव उपक्रम

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील भातगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवली भुवडवाडी ही अतिशय दुर्गम ग्रामीण भागातील शाळा असून भविष्यातील काळाची गरज ओळखून या शाळेने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थी बचत बॅंकेची स्थापना केली आहे. या अभिनव उपक्रमाचे कोळवली पंचक्रोशीतून स्वागत करण्यात येत आहे.
शालेय जीवनात बचतीची सवय लागावी, बॅंकेचे आर्थिक व्यवहार कळावेत, खाऊचे पैसे साठवून भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हातभार लागावा या उदात्त हेतूने शाळा व्यवस्थापन समितीने एक चांगला निर्णय घेऊन तो प्रत्यक्ष अमलात आणला. हा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविण्यासाठी शाळेचे शिक्षक सतिश विचारे व मुख्याध्यापक रवींद्र कुळये यांनी प्रयत्न केले.
या उपक्रमाचे गावचे सरपंच संतोष सावरकर, ग्रामसेवक सुनील कदम, उपसरपंच अजित भुवड, सत्यवान हुमणे, अभि लिंगायत, पाणी कमिटी अध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी कौतुक केले आहे. शाळा स्थापनेपासून प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेने राबविल्याबद्दल शिक्षकांचे विशेष कौतुक केले.


