मुख्य बातमी

काळजी घे, सांभाळून राहा; आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत

ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढ्यात विद्यानंद बापट यांना आई-वडिलांचा ठाम पाठिंबा : पुण्यातील मारहाणीच्या घटनेचा निषेध

रत्नागिरी : गणेशोत्सवातील डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि रस्त्यांवरील मंडपांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात सातत्याने आवाज उठविणारे विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाल्याच्या घटनेनंतर त्यांच्या आई-वडिलांनी ठामपणे पाठीशी उभे राहत मुलाला धीर दिला आहे. ‘काळजी घे, सांभाळून राहा; आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत,’ असे सांगतानाच त्यांनी पुण्यातील मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे.

विद्यानंद बापट यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील गोळप असून, ते सध्या पुण्यात स्थायिक आहेत. त्यांचे वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट हे गोळप येथे राहतात. गणेशोत्सवाच्या काळात डीजेचा वापर तसेच रस्त्यांवरील मंडपांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात विद्यानंद बापट यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात त्यांच्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेचा सुहास बापट यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ‘विद्यानंदने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्याला आमचे पूर्ण समर्थन आहे. त्याने उपस्थित केलेले प्रश्न विचाराने आणि चर्चेतून सोडवायला हवेत. एखाद्या व्यक्तीला मारहाण करून त्याची भूमिका दाबण्याचा प्रयत्न करणे निषेधार्ह आहे,’ असे त्यांनी सांगितले.

मारहाणीनंतर मुलाशी दूरध्वनीवरून संपर्क झाल्याचे सांगताना त्यांनी दिलासा व्यक्त केला. ‘मी बरा आहे,’ असे विद्यानंदने सांगितल्यानंतर मोठा दिलासा मिळाल्याचे सुहास बापट यांनी नमूद केले. मात्र, मुलगा पुण्यात आणि आपण रत्नागिरीतील गोळप येथे असल्याने तातडीने त्याच्यापर्यंत पोहोचता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

विद्यानंद यांच्या आई कल्पना बापट यांनीही मुलाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देत त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. ‘घटनेनंतर त्याच्याशी फोनवर बोलणे झाले. तो सुखरूप असल्याचे समजल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला. मात्र, त्याने काळजी घ्यावी आणि सांभाळून राहावे, असे आम्ही त्याला सतत सांगत आहोत,’ असे त्या म्हणाल्या.

विद्यानंद बापट यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणीही कल्पना बापट यांनी केली आहे. ‘त्यांना योग्य संरक्षण मिळाल्यास आमची चिंता काही प्रमाणात कमी होईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे आई-वडिलांची चिंता वाढली असली तरी ध्वनी प्रदूषणाविरोधात त्याने घेतलेली भूमिका योग्य असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यानंदने आपला मार्ग सोडू नये आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत राहावे, यासाठी आपण कायम त्याच्या पाठीशी राहू, असा निर्धार आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!