मुख्य बातमी

‘माय भारत’ रत्नागिरी जिल्हा शासकीय सल्लागार समितीवर डॉ. ऋषिकेश केळकर यांची नामोनिर्देशित सदस्य म्हणून निवड

रत्नागिरी : भारत सरकारच्या क्रीडा व युवा कार्यक्रम मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वायत्त संस्था ‘माय भारत’ च्या रत्नागिरी जिल्हा शासकीय सल्लागार समितीवर डॉ. ऋषिकेश केळकर यांची ‘नामोनिर्देशित’ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

‘माय भारत’ ही केंद्र सरकारची तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रउभारणीत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काम करणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. युवा पिढीला विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्यातील नेतृत्वगुणांचा विकास करणे आणि शासकीय योजना तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने ही समिती जिल्हा पातळीवर काम करते.

डॉ. ऋषिकेश केळकर यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि युवा संघटन क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन क्रीडा व युवा कार्यक्रम मंत्रालयाकडून त्यांची या उच्चस्तरीय जिल्हा शासकीय सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील क्रीडा, शिक्षण आणि युवा कल्याण क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीबाबत हे सदस्य मार्गदर्शन करणार आहेत.

आपल्या या निवडीबद्दल बोलताना डॉ. ऋषिकेश केळकर यांनी “रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना ‘माय भारत’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना रुजवून देशकार्यासाठी संघटित करणे, याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल,” असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

डॉ. केळकर यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून, तसेच हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!