मुख्य बातमीसामाजिक

अनिता नारकर यांना यमुनाबाई खेर पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या वतीने समाजसेविकेला देण्यात येणारा श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार यंदा चिपळूण तालुक्यातील पेढे-पर्शुराम येथील आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अनिता आत्माराम नारकर यांना जाहीर झाला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश माणिकराव सातव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण येत्या रविवारी (२७ एप्रिल) दुपारी ४ वाजता डॉ. बा. ना. सावंत रोड येथील सर्वोदय छात्रालयातील मोरोपंत जोशी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गीते भूषवणार आहेत. ट्रस्टच्या वतीने दरवर्षी समाजसेवेच्या क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या एका महिला समाजसेविकेला श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा पुरस्काराचे हे सोळावे वर्ष आहे.

सौ. अनिता नारकर या गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई महानगर पालिका येथे त्यांनी १९७८ ते २०१४ या प्रदीर्घ कालावधीत सेवा बजावली. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यातील आरती ही बौद्धिक अक्षम प्रकारातील दिव्यांग आहे. ती ४६ वर्षांची आहे. घरातील कामे ती उत्तमरित्या आवडीने करते. तिने मॅरेथॉन खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

समाजसेवेची आवड व आपल्या मुलीचे अपंगत्व यामुळे सौ. नारकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८ साली चिपळूण तालुक्यातील पेढे, पर्शुराम येथे आरती निराधार सेवा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आता मालघर येथे देखील संस्थेच्या या कामाची सुरवात झाली आहे. गेल्या सहा ते सात वर्षांत संस्थेने अनेक वृद्ध, दिव्यांग, निराधार व पीडित महिलांना आधार दिला आहे. सध्या ४७ व्यक्तींचा सांभाळ संस्थेत कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय करण्यात येत आहे. आपल्या मुलीसह अनेक दिव्यांग व वृद्धांचे मातृत्व स्वीकारणाऱ्या सौ. अनिता नारकर यांना यमुनाबाई खेर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे, श्रीमती सोनवी देसाई, बाळकृष्ण शेलार, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, उपाध्यक्ष जयश्री बर्वे, कार्यवाह नरेंद्र खानविलकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!