मुख्य बातमी

उद्दिष्ट, सातत्य, वेळेच्या व्यवस्थापनातून यशस्वी उद्योजक बना : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

रत्नागिरीत कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे सत्कार

रत्नागिरी : समाजातले काही कमी असेल ते दूर करा. उद्दिष्ट समोर ठेवा, सातत्य ठेवा आणि वेळेचे व्यवस्थापन आणि त्यातून निकाल काय समोर येतो हे पाहिले पाहिजे. अशा कृतीतूनच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा कानमंत्र पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र वामन प्रभुदेसाई यांनी दिला.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने (पुणे) डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल श्री. प्रभुदेसाई यांचा सन्मान रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे रविवारी राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पितांबरी उद्योग समूहाची वार्षिक दहा कोटींची उलाढाल झाली आणि एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मराठी उद्योजकाची १०० कोटींची उलाढाल आहे का असा प्रश्न विचारला. त्यावेळी एकही हात वर आला नाही आणि मी सांगितले पुढच्या दहा वर्षांत व्यवसाय वाढवतो. ५० कोटीवर व्यवसाय नेला पण बाजारातून येणेबाकी राहू लागली. त्या वेळी डॉ. जयंत बालाजी आठवले यांनी गुरुमार्ग दाखवला. त्यानंतर ठेवून १०० कोटींच्यावर उलाढाल केली. गुरुंच्याच आशीर्वादामुळे मला डॉक्टरेट मिळाली, असेही डॉ. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ व केजीएन सरस्वती फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे काम चांगले चालू असून सांगत त्यांच्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत श्री. प्रभुदेसाई यांनी जाहीर केली.

संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई व संचालक सुयोगा जठार, प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, उमेश आंबर्डेकर, ॲड. प्रिया लोवलेकर, चंद्रकांत हळबे, दिलीप ढवळे, सुहास ठाकुरदेसाई यांनी प्रभू श्रीरामाची मूर्ती, राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. केजीएन सरस्वती फाउंडेशनतर्फे चंद्रकांत हळबे, डॉ. शरद प्रभुदेसाई आणि अशोक घाटे यांनीही प्रभुदेसाई यांचा सन्मान केला. कीर्तनसंध्या परिवारातर्फेही अवधूत जोशी व सहकाऱ्यांनी श्री. प्रभुदेसाई यांचा सन्मान केला.

अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाविषयी मनोगत मांडले. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याविषयी ॲड. प्रशांत पाध्ये, डॉ. श्रीधर ठाकूर, प्रमोद कोनकर, ठाणे कऱ्हाडे संघाचे कार्यवाह संदीप कळके यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते ‘कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ (पाचवी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन १९४७ मध्ये (कै.) विष्णू वासुदेव आठल्ये (शिपोशी) यांनी केले आहे. या पुस्तकाबद्दल डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!