मुख्य बातमी

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत शिरगांव हद्दीमधील बाणेवाडी आणि सुतारवाडी येथे दोन वनराई बंधारे

जलसंधारणासाठी मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी आणि ग्रामपंचायत शिरगांव सरसावले

रत्नागिरी : यंदाच्या पावसाच्या बदलत्या परिस्थितीमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘पाणी अडवा–पाणी जिरवा’ तसेच एक दिवस बंधाऱ्यासाठी या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत आणि सेवा संकल्प अभियान अंतर्गत मत्स्य महाविद्यालय शिरगांव आणि ग्रामपंचायत शिरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून सुतारवाडी आणि बाणेवडी येथे वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवासंकल्प अभियानाअंतर्गत आज (१६ ऑक्टोबर) शिरगांव मधील बाणेवाडी आणि सुतारवाडी येथे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) १०० स्वयंसेवक आणि मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे दोन तास श्रमदान केले.

ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाळ्यानंतर नैसर्गिक प्रवाहातून वाहून जाणारे पाणी शक्य तितक्या काळ स्थानिक पातळीवर अडविणे, ते जमिनीत मुरण्यास मदत करणे, भूजल पुनर्भरणास चालना देणे तसेच परिसरातील उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे हा प्रमुख उद्देश आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकसहभाग, श्रमदान आणि स्थानिक पातळीवरील जलसंधारण यांचा प्रभावी समन्वय साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या उपक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीमध्ये मत्स्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदेश पाटील यांनी विद्यार्थ्यांसह सक्रिय सहभाग घेतला. यावेळी शिरगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती फरीदा काझी, ग्रामपंचायत अधिकारी उल्हास कोळी, शिरगांव गण पंचायत समिती आणि जिल्हापरिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष श्रमदानातून अनुभवता आले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी, सामूहिक श्रमाचे महत्त्व आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

बदलते पर्जन्यमान आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता गावपातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे जतन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि लोकसहभागातून लहान जलसंधारण कामांची साखळी निर्माण करणे आवश्यक आहे. ‘आज अडविलेले पाणी ही उद्याच्या जलसुरक्षिततेची गुंतवणूक’ हा संदेश देत मत्स्य

महाविद्यालय, शिरगांव आणि ग्रामपंचायत शिरगांव यांनी संयुक्तपणे राबविलेला हा उपक्रम शैक्षणिक संस्था आणि ग्रामसंस्था यांच्या समन्वयातून लोकसहभागावर आधारित जलसंधारणाचे अनुकरणीय उदाहरण ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!