मुख्य बातमीशैक्षणिक

भारतीय ज्ञान परंपरा एक जीवनपद्धती : डॉ. विनायक रजत भट

रत्नागिरी : “भारतीय ज्ञान परंपरा केवळ संस्कृत भाषेशी निगडीत नसून ती सर्वसमावेशक आहे, कारण भारतीय ज्ञान परंपरा ही एक जीवनपद्धती आहे”, असे गौरवोद्गार चाणक्य विश्वविद्यालयाचे भारतीय ज्ञान परंपरा विभागातील प्रा. डॉ. विनायक रजत भट यांनी काढले.

त्रिदिवसीय भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. या कार्यशाळेचे आयोजन केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली यांच्या निधी सहाय्याने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय  (स्वायत्त)  यांच्या संयुक्त विद्यमाने व चाणक्य विश्वविद्यापीठ, बंगळुरू यांच्या भारतीय ज्ञान परंपरा केंद्राच्या ज्ञान सहयोगाने केले होते. ही कार्यशाळा ६ ते ८ मार्च दरम्यान रत्नागिरी शहरातील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात झाली.

यावेळी आपल्या मनोगतात डॉ. विनायक रजत भट म्हणाले की, “या कार्यशाळेच्या माध्यमातून सगळ्यांना भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय? आणि तिचे आताच्या काळात असलेले महत्त्व नेमके काय? या प्रश्नांची उकल झाली असेल.एखादे पुस्तक कोणकोणत्या अंगाने वाचावे व ते वाचत असताना त्याचे सूक्ष्म वाचन कसे करावे हे आपण आत्मसात केले आहेच. त्यामुळे ही सवय कायम ठेवा. जेणेकरून भारतीय ज्ञान परंपरेत अनेक नवनवीन विषय जोडण्यात तुम्ही भरीव मदत करू शकाल.

यावेळी प्रास्ताविकात रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी संस्कृत व विविध भारतीय भाषा यातील असलेले ज्ञान व त्यातील चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”

अध्यक्षीय भाषणात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आम्ही नक्कीच भारतीय ज्ञान परंपरेत आमच्यापरीने योगदान देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, असा विश्वास दर्शवला.

सकाळच्या सत्रात सर्व सहभागींनी आपापल्या विषयावर सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी प्राध्यापक, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेत एकूण ४५ जणांचा सहभाग होता. यावेळी चाणक्य विश्वविद्यालयातील भारतीय ज्ञान परंपरा विभागातील प्रा. डॉ. विनायक रजत भट , रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ.  दिनकर मराठे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!