सिंधुरत्न २.०च्या माध्यमातून रत्नागिरीच्या विकासाला नवी दिशा
खेडमध्ये आढावा बैठक : रोजगारनिर्मिती व नाविन्यपूर्ण विकासाला प्राधान्य

खेड : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची आढावा बैठक खेड नगर पालिका सभागृहात उत्साहात पार पडली.
सिंधुरत्न कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह विविध विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला चालना देऊन रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले.
१८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ला मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधत विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्यासह भाजपा, युवा मोर्चा, महिला मोर्चा व विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



