खेडमधून एका बांग्लादेशी नागरिकाला अटक
रत्नागिरी दहशतवादविरोधी शाखेची कामगिरी

खेड : खेड पोलीस ठाणे हद्दित कळंबणी आपेडे फाटा येथील सुरू असलेल्या बांधकाम इमारतीमध्ये बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती दहशतवादविरोधी शाखेस मिळाली होती. ११ मार्च रोजी घटनास्थळी जाऊन तेथील कामगारांकडे खात्री केली असता, अकबर अबु शेख (वय ६५ वर्षे, रा. पेडोली, तहसील चौदुलपूर, ठाणा अभयनगर, जिल्हा जेशुर, राज्य ढाका, देश बांग्लादेश) हा एक बांग्लादेशी नागरिक आढळून आला. त्याच्याविरुध्द खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली असून त्याची ४ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेवून पुढील तपास करण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात बांग्लादेशी नागरिक भारतामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करून वास्तव्य करीत असल्याबाबत निर्दशनास आले आहे. शासनाकडून तसेच वरिष्ठांकडून बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी बेकायदेशीरपणे रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करणेबाबत दहशतवाद विरोधी शाखेस सूचना दिल्या होत्या.
ही कामगिरी दहशतवाद विरोधी शाखेतील पोहेकों महेश गुरव, पोहेकॉ आशिष शेलार, पोहेकॉ योगेश तेंडुलकर, पोना रत्नकांत शिंदे व पोकों गोवर्धन राठोड यांनी केली आहे.



