आगाशे विद्यामंदिरात मातकाम उपक्रमात साकारले चिमुकले कलाविश्व!

रत्नागिरी : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मातकाम उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. वर्गशिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली चिमुकेल्या हातांनी मातीच्या स्पर्शातून स्वतःचे एक वेगळेच कलाविश्व निर्माण केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि कलात्मकतेला मोठा वाव मिळाला.
वर्गावर्गांमध्ये सकाळपासूनच कमालीचे उत्साही वातावरण पाहायला मिळत होते. डिजिटल स्क्रीन आणि पुस्तकी जगात रमणाऱ्या या चिमुरड्या हातांनी जेव्हा ओल्या मातीचा स्पर्श अनुभवला, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या उपक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक वस्तू, प्राणी, पक्षी, फळे, भाज्या आणि देवदेवतांच्या मूर्ती साकारल्या. मुलांनी मातीला दिलेले आकार त्यांच्यातील सुप्त कलागुणांची साक्ष देत होते.
मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यशस्वीरित्या साजरा झाला. यावेळी त्या म्हणाल्या, “आजच्या मोबाईल युगात मुलांना मातीचा हा नैसर्गिक स्पर्श मिळणे अत्यंत गरजेचे आहे. माती मळण्यापासून ते तिला आकार देण्यापर्यंतच्या या प्रक्रियेमुळे मुलांच्या हाताच्या बोटांचे स्नायू तर बळकट होतातच, पण त्यांची एकाग्रता आणि निर्णयक्षमताही वाढते. त्यांना त्यातून आनंद तर मिळतोच शिवाय त्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मकतेला वाव मिळतो. हाच आमच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”



