मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात रंगला पाच पालखी भेट सोहळा

संगमेश्वर : तालुक्यातील देवळे येथे दरवर्षी शिमगा उत्सवातून पाच पालखी भेट सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी काल हा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पार पडला. दाभोळे गावातील निनावी आणि भवानी देवींच्या दोन पालख्या मान मानकऱ्यांनी वाजत गाजत देवळेतील होळीच्या मांडावर आणल्या. काही वेळातच मेघी गावचे गावकर गांगोबा देवाची पालखी ही घेऊन आले. तसेच करंजारी गावातील वाघजाई धनीन देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात सामील झाली. देवळेची रवळनाथ कालेश्वरी देवीची पालखीही मांडावर आली आणि एकच जल्लोष. पाच गावातील ढोल ताशा पथकांनी ठेका धरला, गुलालाची उधळण आणि सुरू झाला पाच पालखी भेट सोहळा.

देवळे गावातील रवळनाथ कालेश्वरी देवीचे मानकरी शेट्ये-महाजन यांनी सर्व गावातील गावकऱ्यांना त्यांचे मानपान दिले. त्यानंतर सुरू झाला पाच पालखी भेट सोहळा. पाच पालख्यांंबरोबर आलेल्या ढोल वादकांच्या वादनाने अंगात वारं भरल्यासारख भाविकांनी तालात पालखी नृत्य केले. देवळे, करंजारी, दाभोळे, मेघी, जंगलवाड, चाफवली गावातील भाविकांनी या पाच पालखी भेट सोहळ्याचा आनंद लुटला. हे दृश्य या होळी उत्सवातून प्रत्येकाच्या मनाला आनंद देणारे होते. तहान, भूक हरपून सुमारे दोन ते अडीच तास पालखी नाचवण्याचा आनंद लुटला. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

या वेळी देवळे गावात यात्रेचे स्वरूप आले होते. हा सोहळा पाहण्यासाठी फार दूरवरून भाविक गर्दी करतात. गुलालाची उधळण केली जाते. चतुर्सीमा तसेच देवळेतील सर्व मानकरी, गावकरी, ग्रामस्थ हा सोहळा पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतात. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा आलेल्या भाविकांनी याची डोळा पाहिला आणि धन्य झालो, असे म्हणत कोकणी माणूस शिमग्याला का गावात येतो हे इथे आल्याशिवाय कळणार नाही असेच म्हणत होता.

या कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांनीही भेट दिली आणि सर्व देवतांचे आशीर्वाद घेतले. या पालखी भेट सोहळ्यात सुमारे ६७ वर्षांच्या लक्ष्मी देवळेकर (कशेळी खवटी) यांच्या लाठी-काठी प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर देवळे गावातील ग्रामस्थांनी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या वर्षी विशाल विजय काळोखे यांनी महाप्रदाचा खर्च केला. गावातील सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!