भिडे कार्यशाळेमध्ये “आमचा दिवस आमचा आनंद” जल्लोषात साजरा

रत्नागिरी : डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज (३ डिसेंबर) आविष्कार संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी “आमचा दिवस आमचा आनंद” या मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केले होते. पर्पल कलर दिव्यांग व्यक्तींना समावेशितता आणि समानतेचे प्रतीक मानले जाते. यासाठी पर्पल कलरची थीम ठेवून सर्व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरभाते यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करून दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संगीत शंकू या खेळाचे उद्घाटन लायन्स क्लबचे सचिव शरद नागवेकर, तर ब्लॉक जंप या खेळाचे उद्घाटन ओवन्स कॉर्निंग इंडियाचे मुख्य अभियंता अविनाश खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने व जल्लोषपूर्ण सहभाग घेऊन आपला आनंद साजरा केला. यावेळी ओवन्स कॉर्निंग इंडियाचे सीएसआर समन्वयक (मुंबई) सागर खरात, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पटवर्धन, माजी अध्यक्ष सौ. शिल्पा पानवलकर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी (कनिष्ठ लिपिक) दीपक आंबवले, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी (सामाजिक कार्यकर्ता) संजय बलाढ्ये, फिजियोथेरेपीस्ट डॉ. सौ. जुई मुकादम आदी मान्मवर उपस्थित होते.

दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीसाठी आवश्यक उपकरणाचे वितरण करण्यात आले. ही उपकरणे ओवन्स कॉर्निंग इंडिया प्रा. लि. (तळोजा, मुंबई) यांच्या सीएसआर फंडातून देणगी स्वरूपात देण्यात आली. अविनाश खानविलकर व सागर खरात यांनी ही उपकरणे संस्था अध्यक्ष सीए बिपीन शहा यांना सुपूर्त केली. फिजियोथेरेपीस्ट डॉ. मुकादम यांनी सर्व उपकरणाचे उपयोग सांगून प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी संस्था कोषाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सदस्य संपदा जोशी, मानस देसाई उपस्थित होते.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते व कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी सर्व उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.



