मुख्य बातमी

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो सांगून महिलेची ३५ लाखांची फसवणूक

संगमेश्वर : पुणे येथील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मुलीचा प्रवेश करून देतो सांगून संगमेश्वरातील एका निवृत्त महिलेची तब्बल ३५ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुण्यातील एकाविरोधात देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ महादेव धावडे (४८, रा. लेन क्र. ७, शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, येवलेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या प्रौढाचे नाव आहे.

प्रनिता प्रमोद आगरे उर्फ कल्पना महादेव धावडे (४८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा फसवणुकीचा प्रकार १८ ऑक्टोबर २०२२ ते २० जून २०२४ या कालावधीत घडला आहे. प्रनिता आगरे या सेवानिवृत्त असून, मुंबईतील दादर येथे राहतात. त्यांच्या मुलीला पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे विश्वनाथ महादेव धावडे याने सांगितले.

या प्रवेशासाठी विश्वनाथ धावडे याने प्रनिता आगरे आणि त्यांचे पती प्रमोद आगरे यांच्याकडून २०२२ पासून वेळोवेळी पैसे मागितले. या कालावधीत टप्प्याटप्प्याने एकूण ३५ लाख रुपये त्याने त्यांच्याकडून घेतले होते. मात्र, त्यानंतर विश्वनाथ धावडे याने मुलीचा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करून दिला नाही. यात आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

याप्रकरणी देवरुख पोलीस स्थानकात गुरुवारी (२७ मार्च) भारतीय दंड विधान कायदा कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस करत आहेत.

चार व्यवहारात दिले पैसे

पहिला आणि शेवटचा व्यवहार देवरुख येथील भुवड कॉलनीत झाला, तर दुसरा आणि तिसरा व्यवहार प्रनिता आगरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाला. या रकमेपैकी ३२ लाख रुपये महिलेच्या आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून रोख स्वरुपात काढून देण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!