साडवली येथे १० दिवसीय निवासी मधपाळ प्रशिक्षण शिबिर संपन्न

रत्नागिरी : खादी व ग्रामोद्योग मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने ‘मध केंद्र योजने’अंतर्गत आयोजित करण्यात आलेले दहा दिवसीय निवासी मधपाळ प्रशिक्षण शिबिर १७ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत संगमेश्वर-देवरूख मार्गावरील साडवली एमआयडीसी येथील ‘विश्वकर्मा समूह उद्योग हॉल’मध्ये उत्साहात संपन्न झाले. या निवासी शिबिरामध्ये ११ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून, मधमाशीपालन व्यवसायाचे शास्त्रीय ज्ञान, तांत्रिक बाबी, प्रत्यक्ष हाताळणी आणि व्यावसायिक संधींची परिपूर्ण माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन राजेश मोंगरोनकर व मसुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. एसटी महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी व ज्येष्ठ प्रशिक्षणार्थी दिलीपकुमार साळवी यांच्या सुस्वर गणेशस्तवनाने शिबिराचा प्रारंभ झाला. या वेळी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. जौंजाळ, श्री. इंदूलकर आणि श्री. माने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षणाविषयी मनोगत व्यक्त करताना चिपळूण येथील प्रशिक्षणार्थी अरुण इंगवले म्हणाले, “सामाजिक बांधिलकी, अखंड परिश्रम, त्याग, शिस्त, कर्मयोग आणि कर्तव्यनिष्ठा यांचा आदर्श मधमाशीच्या जीवनशैलीतून शिकायला मिळतो. मधमाशी ही केवळ मध निर्माण करणारा कीटक नसून अन्नसाखळी, कृषी उत्पादन आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. या प्रशिक्षणामुळे आमचा मधमाशीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असून सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश मिळवण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.”
दहा दिवसांच्या या सखोल प्रशिक्षणात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या संजय मालुसरे (उंबर्ले, दापोली) यांनी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी मधमाशीपालनाची प्राथमिक व मूलभूत माहिती दिली. समीर जाधव यांनी मधुमक्षिकापालनातील प्रत्यक्ष मैदानी अनुभव आणि प्रत्यक्ष व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे उपाय सांगितले. प्रा. संतोष नलावडे (नारळ संशोधन केंद्र, भाट्ये) यांनी या व्यवसायातील आर्थिक नियोजन आणि तांत्रिक व्यवस्थापनाचे बारकावे समजावून सांगितले. मिलिंद यादव (उद्योजक व प्रशिक्षक): त्यांनी स्टिंगलेस (नांगी नसलेल्या) मधमाश्यांचे पालन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष मार्गदर्शन केले. श्री. कदम यांनी प्रश्नोत्तरे आणि संवादाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींच्या सर्व शंकांचे निरसन केले.
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आयोजित करण्यात आलेल्या दोन प्रत्यक्ष क्षेत्रभेटी (Field Visits) ठरल्या. यादरम्यान प्रशिक्षणार्थींनी मधमाश्यांच्या पेट्यांची हाताळणी, स्वच्छता आणि प्रत्यक्ष पालन पद्धतीचा थेट अनुभव घेतला.
याशिवाय, पितांबरी समूहाच्या मध प्रकल्पाचे प्रमुख दिलीप जाधव, उद्योजक डॉ. जयेश यादव, अभियंता विजयराव कदम, प्रवीण लाड, विजय गावडे, बोबडे साहेब, क्रिश तेरदाले, अवधूत भिडे, दिलीपकुमार साळवी तसेच दापोली येथील जोशी पिता-पुत्र अशा अनेक मान्यवर व उद्योजकांशी प्रशिक्षणार्थींना संवाद साधता आला. मध केंद्र योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या या शास्त्रीय व व्यावहारिक प्रशिक्षणामुळे कोकणात मधमाशीपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व ग्रामीण उद्योजकतेला मोठी गती मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.


