हातखंबा परिसरात अपघातांची मालिका सुरूच
तीन महिन्यांत सलग तिसऱ्यांदा केमिकलचा टँकर पलटी : वाहतूक दीड तास ठप्प

रत्नागिरी : हातखंबा परिसरातील अवघड चढणीवर टँकर पलटण्याची मालिका सुरूच असून, आज (२६ नोव्हेंबर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक वाहून नेणारा टँकर अचानक पलटी झाला. आजची दुर्घटना ही या पट्ट्यातील सलग तिसरी घटना असल्याचे समोर आले आहे. सततच्या अपघातांनी या धोकादायक वळणाची असुरक्षितता पुन्हा एकदा उघड केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर भर रस्त्यावर उलटा पडला. या टँकरमध्ये कीटकनाशक भरलेले असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये म्हणून अत्यंत दक्षतेने मदतकार्य सुरू करण्यात आले.
अपघातानंतर मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक जवळपास दीड तास पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर अडकलेल्या वाहनांची रांग सोडण्यास करण्यास सुरुवात केली. क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कासुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले.
हातखंबा परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या वळणाच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. या मार्गावरील ट्रॅफिक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणीही जोर धरताना दिसत आहे.



