मालगुंड आरोग्य केंद्राअंतर्गत गणपतीपुळे येथे स्वच्छता मोहिमेत ४२ बॅग प्लास्टिकसह कचऱ्याचे संकलन

रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गणपतीपुळे यांच्या वतीने गणपतीपुळे परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लास्टिक तसेच इतर कचऱ्याच्या तब्बल ४२ बॅग संकलित करण्यात आल्या.
या स्वच्छता मोहिमेची संकल्पना आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांची होती. मोहिमेचे उद्घाटन पोलीस अधिकारी श्री. गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य निरीक्षक राजेंद्र रणसे यांच्यासह या उपक्रमात सीएचओ मनाली तारवे, आरोग्य सेवक विक्रम जाधव, आरोग्य सेविका अश्विनी गोवळकर, आशा सेविका, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन करून एमटीडीसी गेट ते कपिल लॉज हा परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी “स्वच्छ गणपतीपुळे – सुंदर गणपतीपुळे” हा संदेश देत पर्यटक आणि नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता योग्य ठिकाणीच विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले.
पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेचा स्वच्छ व पर्यावरणपूरक परिसर राखण्यासाठी अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषिकेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.


