मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये श्री सत्यनारायण पूजा व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेमध्ये दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून श्री सत्यनारायण पूजा व बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांकरीता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यंदाही आयोजित या कार्यक्रमाला बँकेचे संचालक व अधिकारी कर्मचारीवर्ग तसेच को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

बँकेने यावर्षी कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा, रस्सीखेच, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, फनी गेम्स यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. क्रिकेट स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुका संघ विजेता तर प्रधान कार्यालय रजागिरी संघ उपविजेता ठरला. रस्सीखेच मध्ये देखील लांजा तलुक्याला मागे टाकत संगमेश्वर तालुक्याने बाजी मरली आणि लांजा तालुक्याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले, संगीत खुर्चीमध्ये महिलांमध्ये श्रीम. मनिषा केळकर तर पुरुषांमध्ये संदीप तांबेकर यांनी विजेतेपद पटकावले.

रांगोळी स्पर्धेत श्रीमती अनुजा पुनसकर विजेत्या तर सतीश सावंत उपविजेते ठरले. कॅरम स्पर्धेत महिला जेतेपद श्रीमती अनुजा पुनसकर यांनी पटकावले तर श्रीमती श्रेया खडपे या उपविजेत्या ठरल्या. कॅरम स्पर्धा पुरुषांमध्ये फरिद जुवळे विजेते तर सतीश सावंत उपविजेते ठरले. तसेच बुद्धीबळ स्पर्धेत सुनील वैद्य हे विजयी झाले, तर प्रदीप परीट हे उपविजेते ठरले.

बँकेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेवून स्नेहसंमेलनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यामध्ये महाराष्ट्र गीत, फिल्मी गीत, रेकॉर्ड डान्स यांचे उत्तम सादरीकरणे तर संगमेश्वर तालुक्याने तसेच त्यांचे सोबत अन्य तालुक्यांतील काही कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक नमनाने उपस्थितांची मने जिंकली.

या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या आयोजनामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जिल्हाभरातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३-२४ करीता आपल्या सभासदांना ३० टक्के लाभांश देवून ऐतिहासिक विक्रम केला तसेच बँकेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु. ५००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करून रु. ९५ कोटी इतका ऐतिहासिक नफा मिळविला. बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच बँकेची प्रगती होत असते याची दखल घेऊन, याचेच पारितोषिक म्हणून बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी तसेच सर्व संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांसाठी यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या स्वरूपात करण्यासाठी मान्यता दिली. यामध्ये कर्मचारी वर्गाचे कॅप्टन म्हणजेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच बहुमुल्य मार्गदर्शनामुळे व पुढाकारामुळे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिमाखात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमावेळी बँकेचे संचालक मधुकर टिळेकर, डॉ. अनिल जोशी, महेश खामकर तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर, श्रीकृष्ण खेडेकर तसेच को.ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, को.ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत व युनियनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारीवर्ग व पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे समारोप भाषणावेळी सुनील साळवी व नरेंद्र सावंत यांनी बँकेच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले व अशा पद्धतीचा कार्यक्रम कोणत्याही इतर सहकारी बँकेत केला जात नसल्याचे सांगितले. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले तसेच कर्मचाऱ्यांनी देखील बँकेच्या प्रगतीमध्ये प्रामाणिकपणे काम करून बँकेची प्रगती साधावी, असे आवाहन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांनी देखील समारोप कार्यक्रमावेळी बँकेचे संचालक मंडळाने कर्मचारी वर्गासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करून सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास मान्यता दिली, त्याबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळाचे आवर्जून आभार मानले.

कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कर्मचाऱ्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व झोकून देवून काम करून बँकेचे हित जोपासावे आणि आपल्या बँकेला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ‘नंबर एक’ला घेऊन जाण्यासाठी कटीबद्ध रहावे, असे आवाहन केले. बँकेने आयोजित केलेला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. शेवटी बँकेचे उपसरव्यवस्थापक संदीप तांबेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र साळवी व श्रीमती त्रिवेणी माळवदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!