अमित साळवी यांच्याकडून पोलिसांसाठी शुगर टेस्ट मशीन किटचे वाटप

राजापूर : ऑन ड्युटी २४ तास असणाऱ्या पोलीस बांधवांच्या आरोग्याचा विचार करून आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाचल येथील तरुण उद्योजक अमित साळवी यांनी लांजा, राजापूर व नाटे पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सुमारे १५० पोलीस बांधवाना पट्टी व शुगर टेस्ट मशीन अशा एकत्र किटचे वाटप केले.
अमित साळवी हे तालुक्यातील पाचल येथील तरुण उद्योजक असून गेली १० वर्षे ते आपल्या गायत्री डिस्ट्रिब्युटर्स या व्यवसायातून औषधे व वैद्यकीय साहित्य विक्री करत आहेत. पाचल येथील ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी विभागप्रमुख आप्पा साळवी यांचे ते चिरंजीव, तर तळवडे ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच सौ. गायत्री साळवी यांचे पती आहेत. साळवी कुटुंबीय गेली अनेक वर्षे पाचल येथे अनेक समाजिक कामांमध्ये सहभागी होत असते. अमित साळवी हे आपला व्यवसाय सांभाळून समाजिक बांधिलकीतून जनतेची सेवा करत असतात.
जनतेच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या पोलीस बांधवाना कर्तव्यासाठी आपल्या आरोग्याशीही तडजोड करावी लागते. व्यस्त दिनचर्येमुळे आपल्या आरोग्यासाठी पाहिजे तेवढा वेळ ते देऊ शकत नाहीत. त्याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना अनेकदा दिसतात. त्यामुळे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. साळवी यांनी यांनी या किटचे वाटप केले आहे.
युवासेना कार्यकारिणी सदस्य तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या अपूर्वा सामंत यांच्या हस्ते पोलिसांना शुगर टेस्ट मशीन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस बांधवानी अमित साळवी व सामंत कुटुंबीयांचे आभार मानले.



