नगरपालिका प्रशासनाने रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करावी
नीलेश आखाडे यांची निवेदनाद्वारे मागणी : प्रभाग क्रमांक ६ मधील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष

रत्नागिरी : शहरातील पावसाळ्यापूर्वी केले जाणारी कामे पूर्ण पूर्ण करावी. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील नळ पाणी योजना, भूमिगत गॅस पाईपलाईन, भूमिगत विद्युत वाहिन्या यासाठी खोदण्यात आलेले रस्ते काम पूर्ण झालेल्या परिसरात रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी एका निवेदनातून केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील विविध भागातील कामांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. नाचणे रोड रस्त्यालगत डांबरी साईट पट्टा लवकरात लवकर पूर्ण करावा, मारुती मंदिर ते दाते कॉलनी अंतर्गत रस्ता अनेक वर्ष डांबरीकरण न केल्यामुळे नांगरलेल्या जमिनीप्रमाणे झाला असून तो तातडीने करण्यात यावा, जोगळेकर कॉलनी ते दामले विद्यालय रस्त्यालगत असणारे गटार यावरील लाद्या मोडकळीस आल्याने गटार उघडे पडले आहे; याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना होत असून गटारावर तातडीने लाद्या बसविण्यात याव्यात, आनंद नगर परिसरात खोदकाम करण्यात आलेले रस्ते डांबरीकरण व्हावे, अभ्युदयनगर परिसरातील गटार यांवर लाद्या बसवून बंदिस्त करावे, सहकार नगर परिसरातील काही ठिकाणी गटारांवरील लाद्या खराब झाल्या आहेत त्या बदलण्यात याव्या व रस्ते डांबरीकरण व्हावेत, अभ्युदय नगरकडून चैत्रबनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले पथदिवे पुन्हा बसविण्यात यावे, विश्वनगर येथील अपूर्ण अवस्थेत असलेले उद्यानाचे काम तातडी पूर्ण करण्यात यावे जेणेकरून लावण्यात येणारी झाडे व हिरवळ पावसाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढतील. परिसरातील नागरिकांना या उद्यानामध्ये वावरता येईल. तसेच नाचणे पावर हाऊस गजानन महाराज मंदिरासमोर तपोवन अपार्टमेंट कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, अशी विविध कामांच्या पूर्णत्वाची मागणी आखाडे यांनी केली आहे.
या निवेदनामध्ये नूतन नगर परिसरातील समस्यांवर विशेष लक्ष वेधले असून, येथे असणारी उघडी गटारे, खोदण्यात आलेले रस्ते, परिसरातील धुळीचे साम्राज्य या सर्वांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नीनिलेश आखाडे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

