गोव्यात अपघात करून पसार झालेला कंटेनर रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात

रत्नागिरी : गोव्यात अपघात करून पसार झालेला कंटेनर रत्नागिरी पोलीसांच्या ताब्यात घेतला आहे. पुढील कार्यवाहीसाठी सदर कंटेनर चालक व कंटेनर गोवा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या कंटेनरची माहिती गोवा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक निनाद देऊळकर यांनी रत्नागिरी पोलीस दलास दिली. माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे व त्यांच्या पथकाने तात्काळ शोध मोहीम राबवली.
तपासादरम्यान कंटेनर हा कुवे येथे गोवा-मुंबई महामार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे व त्यांच्या पथकाने कंटेनरचा पाठलाग करून वाहनासह चालकास ताब्यात घेतले. चालक व कंटेनर पुढील कार्यवाहीसाठी गोवा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.



