नाट्य परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आज कार्यक्रम

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीतर्फे आज (२७ मार्च) सायंकाळी ६ वाजता प्रतिवर्षीप्रमाणे मारूती मंदिर येथील स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या प्रवेश पायऱ्यांवर जागतिक रंगभूमी दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नटराजपूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात होणार आहे.
नाट्य परिषदेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मीचा सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धात्मक आणि उत्सवी रंगभूमीवर अनेक वर्षे कार्यरत असलेले बसणी येथील अजित पाटील, स्पर्धात्मक रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रा. सुजन शेंडे यांचा सन्मान होणार आहे. शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रवेश, रेकॉर्ड डान्स आदी प्रकारातील मर्यादित सादरीकरण होणार आहे. इच्छुकांनी आपली नावे अमेय धोपटकर, वामन कदम, सनातन रेडीज यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.



