मुख्य बातमी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ सुरू; विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), रत्नागिरी घटकाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी हा सप्ताह “समृद्धीसाठी सत्यनिष्ठा” या संकल्पनेवर आधारित राबवला जात आहे.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी काल सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. याप्रसंगी राज्यपाल व मुख्यमंत्री यांचा दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्तचा संदेश वाचून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

दिवसभरात राबवण्यात आलेले प्रमुख उपक्रम : 

माहिती फलक व जनजागृती – शहरातील मारुती मंदिर सर्कल, जिल्हा परिषद, जेलनाका, जिल्हाधिकारी कार्यालय, शहर बसस्थानक, माळनाका बस स्टॉप, शासकीय विश्रामगृह, नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रमुख ठिकाणी ला.प्र.वि. ठाणे परिक्षेत्र व रत्नागिरी कार्यालयाचे संपर्क क्रमांक, टोल-फ्री क्रमांक, वेबसाईट, व्हॉट्सॲप व ई-मेल दर्शविणारे फ्लेक्स प्रदर्शित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालयात व्याख्यान – पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित व्याख्यानात पोलीस उपअधीक्षक श्री. पाटील आणि पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सत्रात सुमारे ६० ते ७० पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा : संगमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा येथे पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य हसन गफूर शेख यांच्या मनोगतानंतर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली.

लांजा व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चर्चासत्र : लांजा येथे पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांच्या उपस्थितीत पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले गेले, ज्यामध्ये पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातही अधिकारी व अंमलदारांसाठी विशेष चर्चासत्र पार पडले.

पत्रके वाटप व थेट संवाद: प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात भित्तीपत्रके लावून नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

माध्यमांद्वारे प्रसार : सायंकाळी पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांची विशेष मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली. याशिवाय स्थानिक वृत्तपत्रे, केबल टीव्ही, आकाशवाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरोधी संदेश सर्वदूर पोहोचवण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!