गो सन्मान अभियानांतर्गत राजापूर तहसीलदारांना निवेदन

राजापूर : गोसंवर्धन व गोसंरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत सोमवारी राजापूर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात भारतीय संस्कृतीत गोमातेचे विशेष स्थान अधोरेखित करण्यात आले असून, ती आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गोवंश सुरक्षित नसेल, तर सांस्कृतिक परंपरा अपूर्ण राहील, त्यामुळे गोसंरक्षणासाठी केंद्र शासनाने ठोस व प्रभावी धोरणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
सध्याच्या काळात विविध कारणांमुळे गोवंशासमोर अनेक आव्हाने निर्माण होत असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी एकसमान राष्ट्रीय धोरण आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच भारतीय संविधानातील कलम ४८ नुसार गोवंश संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, कत्तल प्रतिबंधासाठी कठोर अंमलबजावणी करावी आणि गोसंरक्षणाला अधिक कायदेशीर बळ द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
याशिवाय देशी गोवंशाला विधीवत सेवा, संरक्षण व राष्ट्रीय सन्मान मिळावा, तसेच स्वतंत्र केंद्रीय गोवंश मंत्रालय स्थापन करण्यात यावे, असा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
या अभियानात संत समाज, गोभक्त व विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असून, देशातील नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर निवेदन राजापूर तहसीलदार श्री. विकास गंबरे यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी महेश मयेकर, अविनाश पाटणकर, संदेश टिळेकर, अभिजीत नार्वेकर, किरण तुळसावडेकर, रघुवीर बापट, नरेंद्र पावसाकर, विनोद गादीकर, मोहन घुमे, राजेंद्र कुशे, माधवी हर्डीकर, शीतल पटेल, प्रेरणा नार्वेकर, उर्मिला बाकाळकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



