वालोपे येथे ट्रकची दुचाकीला धडक; दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे एका ट्रॅकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. अपघात करून पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. रविवारी रात्री हा अपघात झाला. त्यानंतर लागलीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
वालोपे येथे महामार्गावर ट्रकने टू व्हीलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात बालिकेचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला. या बालिकेचे आई- वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी हलवले.
अपघातानंतर गाडी चालक पळून गेला; परंतु नंतर त्याला पकडण्यात आले. या घटनेनंतर संतप्त वालोपे ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर आले व त्यांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी असंतोष वाढला होता. दरम्याने तेथे पोलीस दाखल झाले. पोलीस व ग्रामस्थांमध्येही शाब्दिक चकमक सुरू होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले.


