मुख्य बातमी

रत्नागिरी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत शहरातील झाडगाव येथील ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिवस’ निमित्त विशेष ‘कृती कार्यक्रम’ आखण्यात आले होते.

जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त अगदी थाटा माटाने साजरा केला जातो. सागरी प्रदूषण, लोकसंख्याचा भस्मासूर, ग्लोबल वॉर्मिंग, योग्य शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यानिमित्त दरवर्षी एक थिम राबवली जाते. सन २०२५ ची जागतिक पर्यावरण दिनाची थीम “प्लास्टिक प्रदूषण संपवू” (End Plastic Pollution) अशी आहे. सर्वप्रथम १९७३ साली हा दिवस साजरा केला गेला. आता जगभरातील १४३ हून अधिक देशांचा यामध्ये सहभाग असतो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे सर्वप्रथम सकाळी मत्स्य जलशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने शिरगाव खाडी (खारभूमी बंधाऱ्याजवळ) येथे ‘प्लास्टिक प्रदूषण मुक्ती अभियान’ अंतर्गत खाडीतील प्लास्टिक युक्त कचरा गोळा करण्यात आला. तसेच खारफुटीच्या रोपांचे वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. यावेळी मत्स्य महाविद्यालयातील मत्स्य जलशास्त्र विभाग मधील डॉ. आसिफ पागरकर, डॉ. अनिरुद्ध अडसूळ, तसेच एनएनएस प्रमुख डॉ. संदेश पाटील, मत्स्य विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. भावेश सावंत व डॉ. सुहास वासावे आणि मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या पेठकिल्ला येथील नवीन इमारत प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. येथील इमारत प्रक्षेत्रावर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यटन स्थळ म्हणून विचार करून क्रिसमस ट्री, बदाम झाडे, आणि शोभिवंत झाडांची लागवड करण्यात आली. यानंतर ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ च्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने ‘पर्यावरण शपथ’ घेतली.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहयोगी संशोधन अधिकारी व प्रा. डॉ. आसिफ पागारकर, अभिरक्षक व प्रा. डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, जीवशास्त्रज्ञ श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, तसेच वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक रमेश सावर्डेकर यांनी विशेष सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी यंत्र चालक बोट महेश किल्लेकर, मत्स्यालय यांत्रिक मनीष शिंदे, वरिष्ठ लिपिक श्रीमती जाई साळवी, लिपिक सचिन पावसकर, बोटमन दिनेश कुबल, शिपाई सुहास कांबळे, मजूर सचिन चव्हाण, क्षेत्र संग्राहक प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम, उल्हास पेडणेकर व प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!