खांबिवलीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

तळा (किशोर पितळे, जि. रायगड) : तळा येथील श्रीगणेश मंगल कार्यालयात शिवसेनेची तालुका आढावा बैठक व जाहीर पक्ष प्रवेश सोहळा येथे १० सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, युवा अधिकारी विपुल उभारे, तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, तळा शहर प्रमुख राकेश वडके, जिल्हा कोअर कमिटी, सदस्य लिलाधर खातू, कैलास पायगडे, नगरसेवक नरेश सुर्वे, मंगेश पोळेकर, नगरसेविका नेहा पांढरकामे, नगरसेवक भास्कर गोळे, स्मिता पाडळकर, लता मुंढे, नमित पांढरकामे, भाजप मंडळ अध्यक्ष रितेश मुंढे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. भरत गोगावले म्हणाले की, आमच्या भागाच्या विकासासाठी निधीची मागणी केली. त्याप्रमाणे जवळपास ५ कोटींचा निधी दिला. काम करण्याची मानसिकता असावी लागते. त्यांनी पाणी पुरवठाबाबत मागणी केली. वारंवार पाठपुरावा केला आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कामाची मंजूरी घेतानाच १३ कोटी ८ लाखांचा निधी दिला. त्यामुळे इतरांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. धनिकाचे शेठ होण्यापेक्षा गरिबाचे शेठ होणे कधीही चांगले. माझ्याकडे आलेला माणूस विन्मुख जात नाही. तो कोणत्या जाती, धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या मतदारसंघाचा आहे याचा कधी विचार करत नाही. या मतदारसंघात निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील इतक्या मोठ्याप्रमाणावर होत असलेल्या पक्ष प्रवेशाने भारावून गेलो आहे. खांबोली आदिवासीवाडी, रहाटाड गांव, रहाटाड मुस्लिम समाज जवळपास २५० जणांनी पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून आपल्या रखडलेल्या विकास कामाची यादी द्या. मागणी पूर्ण केली जाईल. वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन यावेळी गोगावले यांनी दिले.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ तळा तालुक्यातील राष्ट्रवादीसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्षात राहून कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नाही. राष्ट्रवादीचे नेते फक्त आश्वासनेच देत आले आहेत. शिवसेनेच्या कार्यप्रणालीने प्रेरीत होऊन पक्षप्रवेश करीत असून, भविष्यात देखील आम्ही शिवसेनेबरोबर राहणार असल्याची खात्री दिली. यावेळी खांबोली, तारास्ते, निगुडशेत, गीरणे, रहाटाड मांदाड, बारपे व नगरपंचायत हद्दीतील अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



