मुख्य बातमी

नवकल्पना, सर्वे, अभ्यासाशिवाय तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकत नाही : दीपक घैसास

केबीबीएफची ग्लोबल मीट उत्साहात

रत्नागिरी : वर्तमानात व भविष्यातही लोक विचार करणे सोडून देतील. कारण तुम्हाला तयार विचार मिळतील, पण ज्ञान मिळणार नाही. आपण एखाद्या टॅक्सीत बसलो की आपल्याला गाडी चालवण्याची माहिती आहे पण तुम्ही कृती करत नाही. त्याप्रकारे लोक विचार सोडतील. त्यामुळे यश मिळवण्यासाठी स्वतःच्या कमतरता लक्षात घ्या. आपल्या व्यवसायाची वेबसाईट असली पाहिजे. एक्सेल, वर्ल्ड आणि आता एआयची साथ घ्या. सर्वे, अभ्यास, नवकल्पना याशिवाय तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकत नाही. गुगलवर माहिती घ्या. पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. असे प्रतिपादन आय-फ्लेक्स सोल्यूशन्सचे संचालक दीपक घैसास यांनी केले.

अंबर हॉलमध्ये कऱ्हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाउंडेशनने (केबीबीएफ) आयोजित केलेल्या ग्लोबल मीट कार्यक्रमात जागतिक अस्थिरतेचा व्यावसायिक परिणाम, संधी आणि आव्हाने यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्लोबल मीटचे उद्गाटन श्री. घैसास यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, दीपक गद्रे, डॉ. श्रीधर ठाकुर, श्रीपाद खेर, केबीबीएफचे ग्लोबल अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष योगेश मुळ्ये, खजिनदार वैशाली वरणेकर, सचिव विप्लव भागवत, रत्नागिरी शाखाध्यक्ष सुहास ठाकुरदेसाई उपस्थित होते. अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी श्री. घैसास यांचा सत्कार केला.

श्री. घैसास म्हणाले की, अमेरिका, चीन हे देश आर्थिक महासत्ता आहेत. आहे. चीनकडून सुटे भाग निर्यात होतात. परंतु गेल्या दोन वर्षांत ही बाजारपेठ भारताने मिळवली आहे. पुढील १० वर्षांत भारत मोठे उत्पादन करणारा जगातला मोठा देश बनणार आहे. एक वर्षात दिसणारी ही गोष्ट नसून त्याकरिता काही वर्षे द्यावी लागतील. छोट्या देशांना आत्मनिर्भर होणे शक्य नाही. परंतु भारत आत्मनिर्भर होणार आहे. जगात सुरू असलेली युद्धं यासह अमेरिकन सरकारच्या धोरणांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर व आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतील याचा अभ्यास केला पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, एकच गोष्ट करून कंपनीला यश मिळत नाही. सातत्याने बदल करावा लागतो. एकट्याने व्यवसाय करण्यापेक्षा मित्राला सोबत घ्या. तुमच्या कमतरता लक्षात घेऊन मित्र त्या गोष्टीत हुषार असेल तर दोघांची चांगली साथ एकमेकांना मिळते. अन्यथा एकमेकांशी स्पर्धा होते. पैसा हे सर्वस्व नाही, असे आपल्या मनावर लहानपणापासून ठसवले गेले. परंतु आपल्याला १०० कोटींच्यावर व्यवसाय केला पाहिजे याकरिता ब्राह्मणांनी उद्दिष्ट ठरवावे. संधी कधीही येते, त्यामुळे डोळे जागृत ठेवा. ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, त्यामुळेच ही मोठी संधी आहे व यातूनच ब्राह्मण समाजाचा उत्कर्ष झाला आहे. समाजातील अन्य घटकांनाही सोबत घेऊन जाणे हे ब्राह्मणांचे वैशिष्ट्य आहे, ग्लोबल मीट ही आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या.

भारतीयांचा जुगाड

सर्वे, अभ्यास याशिवाय तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकत नाही. गुगलवर माहिती घ्या. पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. सध्या बाजारात पैसा भरपूर आहे. भारतीय लोक जुगाड करण्यात हुषार आहेत. एका जर्मन कंपनीच्या मशिनमध्ये बिघाड झाला. त्यावेळी कंपनीने करोडो रुपये खर्चून त्यावर मात केली व भारतात ते मशिन वापरणाऱ्या एका उद्योजकाने फक्त ४०० रुपयांत त्यावर उपाय शोधला. भारतात बुद्धिमत्ता भरपूर आहे. पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या म्हणजेच हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी जनतेसाठी फक्त २ रुपयांत चहा पाकिटे, साबण व दैनंदिन गरजा भागवणाऱ्या वस्तू विकण्याचे मॉडेल यशस्वी झाले. कारण या जनतेला जास्त पैसे देणे शक्य नसते व कमी गुंतवणुकीत त्यांना दररोज वस्तू घेता येत असल्याने भारतात क्रांती झाली व वस्तूंची विक्री वाढली, असे श्री. घैसास यांनी सांगितले.

लाडू ऐवजी एनर्जीबार

मध्यंतरी एक महिला उद्योजिका मला कार्यक्रमात भेटल्या. त्या विविध प्रकारचे लाडू विक्री करतात. मी त्यांना सांगितले की, अळिव लाडू फक्त बाळंतिणीने नव्हे तर सर्वांनी खाल्ला तरी चालतो. मेथीचा लाडू कडवट असल्याने जास्त लोक खात नाहीत. लाडू हा गोलच असला पाहिजे का, त्याऐवजी लाडू करा व तो थापा व त्याला एनर्जी बार असे नाव द्या. त्यांनी असे केले व २५ रुपयांचा लाडू एनर्जी बार नावाने जास्त किंमतीने विक्री होऊ लागला. अशा प्रकारे नवनवीन कल्पना आणल्या पाहिजेत. बाजाराचा अभ्यास, पॅकेजिंग, अभ्यास, ग्राहक बदलला असेल तर नवी संधी शोधली पाहिजे, असेही श्री. घैसास यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!