अमली पदार्थ बाळगणारा एकजण पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : शहरातील माळनाका ते एसटी कॉलनी परिसरात “ब्राऊन शुगर टर्की” सदृश्य अमली पदार्थाच्या ८ ग्रॅम वजनाच्या एकूण ८८ पुड्या बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला ताब्यात घेण्यात यश आले आहे. याप्रकरणी अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप ता. जि. रत्नागिरी) यास पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले त्याला पुढील कारवाईसाठी शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये माळनाका ते एसटी कॉलनी जाणाऱ्या टोडवर गस्त घालत असताना पोलिस अभिलेखावरील गुन्हेगार त्याच्या ताब्यातील मोटर सायकलवर बसून संशयित हालचाली करत असताना दिसून आला. त्याच्या ताब्यातील साहित्याची खात्री करण्यासाठी दोन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील पिशवीमध्ये “ब्राऊन शुगर टर्की” सदृश्य अमली पदार्थाच्या ८ ग्रॅम वजनाच्या एकूण ८८ पुड्या मिळून आल्या.
याप्रकरणी अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप ता. जि. रत्नागिरी) यास पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडील २ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा “ब्राऊन शुगर टर्की” व एकूण १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अद्वैत चवंडे आणि मुद्देमाल पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक शेषराव शिंदे, सहायक पोलिस सुभाष भागणे, पोहवा शांताराम झोटे, पोहवा बाळू पालकर, पोहवा अमित कदम, पोहवा गणेश सावंत, पोहवा प्रवीण खांबे, पोहवा सत्यजीत दरेकर यांनी बजावली.


