संत ज्ञानेश्वर, सम्राट अशोक आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य विद्यार्थ्यांसाठी आदर्श : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : “ज्ञानेश्वर महाराजांनी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. सम्राट अशोकाने सम्राटपदाची जबाबदारी पेलली. छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास घडवला. अशा थोर व्यक्तींचं आयुष्य हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावं. त्यासाठी शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररुपी मूर्ती घडविली पाहिजे,” असे विचार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये काल (२७ जून) झालेल्या “विद्यार्थी दशा आणि दिशा” या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “हा कार्यक्रम म्हणजे केवळ माहितीचा नव्हे तर संस्कारांचाही संगम आहे. शाळेतील शिक्षक हे केवळ शिक्षक नसून, संस्कारवर्गाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याकडून शिक्षणाबरोबरच संस्कार मिळणे ही खूप मोठी संपत्ती आहे. हीच योग्य वेळ आहे. प्रत्येकाने अमली पदार्थांपासून दूर राहणं आणि इतरांनाही दूर ठेवून आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं स्वास्थ्य टिकवावे. अमली पदार्थांमुळे केवळ मुलंच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाज बिघडतो. शिक्षकांनी स्वत:हून अशा कामात पुढाकार घेवून नवी पिढी घडवावी. स्वस्थ समाज घडवावा. अशा कार्यक्रमांची जनजागृती करावी.”
कार्यक्रमास शिक्षक आणि १० वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



