
रत्नागिरी : जिल्हा हा टीबीमुक्त व्हावा, यासाठी क्षयरोग विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी ३७६ उपकेंद्रांची टीम, १४०१ आशा वर्कर व विविध कर्मचारी घरोघरी सर्व्हे करणार आहेत. कृती आराखडा अंतिम टप्प्यावर आला असून १ जुलैपासून अभियानास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात २०१५ साली मोठ्या प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून इलाज करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०२५ पर्यंत संख्या ३८ टक्क्यांनी कमी झाली आहे. तरी जिल्हा शंभर टक्के टिबी मुक्त व्हावा यासाठी विभाग काम करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत करू असा संकल्प केला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात अभियान, जनजागृती सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे, आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत टीबी मुक्त भारत अभियान सुरू करणार आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे.
आशा वर्कर, उपकेंद्राची टीम हे सर्वजण शहर, जिल्ह्यातील घरात जावून सर्व्हे करणार. यामध्ये ६० वर्षावरील व्यक्ती, लो बीएमआय, टीबीचा आजार होवून गेला पुन्हा टिबी झाला, झोपडपट्टी, दुर्गभ भागात जावून सर्व्हे करणार त्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांना उपचारासाठी सिव्हिलला पाठवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कित्येक असे व्यक्ती आहेत की त्यांना टीबीचा त्रास आहे. मात्र ते सांगत नाहीत. ते घाबरतात, खेड्या पाड्यात जनजागृती नसल्यामुळे ते इलाज करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे या अभियानात ते स्वतःहून पुढे आल्यास त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येतील.
क्षयरोग विभागाच्या वतीने क्षयरुग्णांना निक्षयमित्र या योजनेतून कोरडा पोषण आहार देण्यात येते. काहींना दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. अद्यापही ६०० पेक्षाही अधिक रुग्ण आहेत की त्यांना चांगला आहार देण्यासाठी दानशूर व्यक्ती मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, कंपनी, संस्था, एनजीओ यांनी स्वतःहून पुढे येवून मदत करावी, असे आवाहन क्षयरोग विभागाच्या वतीने करण्यात आले.
जिल्ह्यात १ जुलैपासून टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचारी, आशा वर्कर आपल्या घरी सर्व्हे करण्यासाठी येतील. त्यांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.



