चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला
अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी नंदिवसे येथील खडपोली पूल २३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता कोसळला. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली जाणाऱ्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एमआयडीसीकडे हस्तांतरित केलेला होता. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण येथील ‘सहकार भवन’मध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत विशेषतः पुलांच्या बांधकामाबाबत बैठक घेतली होती. रस्ता, पूल यासाठी २७ कोटी मंजूर केले होते. पावसाळ्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून, पावसाळ्यानंतर काम सुरू झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.



