Uncategorized

जिल्हास्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत पाटपन्हाळे हायस्कूल प्रथम

आबलोली (संदेश कदम) : ग्रंथाली प्रतिभांगण, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय विज्ञानधारा एकांकिका स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने प्रथम क्रमांक संपादन केला. विजेत्यांना आकर्षक चषक, रोख पाच हजार रुपये व पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके या स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

विज्ञान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञानधारा विज्ञान एकांकिका स्पर्धा ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल वालोपे (ता. चिपळूण) या ठिकाणी नुकतीच झाली. या शैक्षणिक उपक्रमासाठी मान्यवर म्हणून जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, चिपळूण पंचायत समितीचे श्री. शिगवण, श्री. देसाई, रत्नागिरी विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदेश कदम, कार्यवाह सुभाष सोकासने, श्री. बनगर, शिवाजी पाटील, चिपळूण तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष शैलेश सुर्वे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने “कचरा व कचरा स्त्रोत” या विषयावर नाट्यातून विज्ञानाकडे ही एकांकिका सादर करून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक संपादन केला. विद्यालयातर्फे शमिका सुमंत भिडे, नेहा संदीप निवाते, ओजस्वी सुधीर वासनिक, कस्तुरी समीर वझे, सावनी विक्रांत दीक्षित, शार्दुल भूषण ओक, मिहीर समीर पुरोहित या विद्यार्थ्यांनी एकांकिकेत सहभाग नोंदवून सादरीकरण करून सुयश पटकावले.

स्पर्धेतील यशामुळे विज्ञान भवन मुंबई येथे विज्ञान एकांकिका स्पर्धेत एकांकिका सादरीकरणाची संधी पाटपन्हाळे विद्यालयाला लाभणार आहे. सुयशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक के. डी. शिवणकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. वाय. भिडे तसेच शशिकांत महाजन आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. एस. एस.चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!