मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एसटी महामंडळाकडून गणेशभक्तांना ३० टक्के प्रवास भाडे वाढीची भेट
गणेशभक्त कोकणवासीय प्रवाशी संघ मुंबईचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केला जाहीर निषेध

आबलोली (संदेश कदम) : गौरी- गणपती सणासाठी ग्रुप पद्धतीने आपापल्या गावात जाणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ३० टक्के प्रवासी भाडेवाढ केली, त्याचा गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव “महाराष्ट्र उत्सव” म्हणून जाहीर केला. गणेशोत्सव कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मुंबईतील सर्व चाकरमानी एसटीने आपल्या गावी जात असतो. पारंपरिक पद्धतीने आनंदात उत्साहात गौरी- गणपती सण साजरा करतो. गणेशभक्तांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून यावर्षी शासनाने ५ हजार जादा एसटी गाड्या सोडण्याची घोषणाही केली आहे, तर एसटी महामंडळाने ३० टक्के प्रवासी भाडे वाढ केली आहे. हा किती विरोधाभास आहे.
मान. मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांनी गणेश भक्तांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून आणि सर्वसामान्य गणेशभक्तांचा गौरी-गणपती सण, महाराष्ट्र सरकारला अपेक्षित असलेला महाराष्ट्र गणेशोत्सव आनंदात, उत्साहात साजरा व्हावा अशी प्रामाणिक इच्छा असल्यास एसटी महामंडळाने केलेली ३० टक्के प्रवासी भाडेवाढ रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबईचे कार्याध्यक्ष दीपक मा. चव्हाण यांनी केली आहे.



