सेवा पंधरवडा अभियानांतर्गत कातकरी समाजास दाखले वितरणासाठी मोहीम राबवा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : सेवा पंधरवडा कालावधीत जिल्ह्यातील कातकरी समाजासाठी मोहीम स्वरूपात युद्धपातळीवर तालुकानिहाय आधार नोंदणी, जातीचे दाखले, रहिवास दाखले, निवडणूक ओळखपत्र व रेशनकार्ड वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यांनी दिले.
“छत्रपती शिवाजी महाराज” महाराजस्व अभियानातंर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, या कालावधीमध्ये दापोली तालुक्यामध्ये “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. या अभियानातंर्गत तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रम २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येत असून दापोली तालुक्यातील शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी आवश्यक असलेले दाखले (अधिवास दाखला/जातीचा दाखला) वाटप करणे हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली तालुक्यात २४ सप्टेंबर रोजी आदिवासी समाज मंदिर, शिरसेश्वर वाडी व २५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय कुडावळे येथे आदिवासी/कातकरी समाजासाठी विविध सेवा विषयक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात आधारकार्ड नोंदणी व अपडेशन ६०, पुरवठा विषयक सेवा- १६, विविध दाखले अर्ज प्राप्त ५७, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी- २३ याप्रकारे अर्ज स्वीकारण्यात आले.
शिबिरास आदिवासी बांधवामार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते. तहसीलदार अर्चना बोंबे, मंडळ अधिकारी सयाजी पवार, किरण आंभोरे व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. शिबिरामध्ये तहसीलदारांनी आदिवासी समाजास मार्गदर्शन केले.



