म्हसळा बाजारपेठेत चलनाच्या तुटवड्यावर स्टेट बँकेनी काढला उपाय
व्यापाऱ्यांना केले चिल्लरचे वाटप

म्हसळा (संजय खांबेटे) : ऐन गौरी- गणपतीच्या हंगामात दहा रुपयांच्या चलनाच्या तुटवड्यामुळे म्हसळा (जि. रायगड) बाजार पेठेतील व्यापारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत. काही महिन्यांपासून म्हसळ्यामध्ये प्रथम चलनातून दहा रुपयांच्या नोटा गायब झाल्या; परंतु आता तर दहा रुपयांची नाणी देखील मिळत नसल्यामुळे व्यापारी, ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे; परंतु हा कृत्रिम तुटवडा नेमका का झालाय याबाबत माहिती मिळत नसल्याने शंकेचे निरसन करायचे कोणी? याबाबत सर्वांचेच मौन असताना सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक व्यापारी संजय खांबेटे यांच्या नेतृत्वाखाली दिलीपशेट चौधरी, नवरंगशेट, भवरशेट, रणजीत शेट, अनिकेत जैन यांच्या शिष्टमंडळाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक यांची भेट घेऊन चलनातून दहा रुपयांच्या नोटा गायब झाल्या तसेच आता १० रुपयांची नाणी देखील मिळत नसल्यामुळे व्यापारी, ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली.

बँकेच्या व्यवस्थापकांनी माणगाव शाखेशी तात्काळ बोलणे करून प्रत्येक आठवड्याला किमान ५० हजार ते १ लक्ष रुपयाची नाणी म्हसळा बाजारात व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वितरीत करू ,असे आश्वासित केले. त्याप्रमाणे २९ जुलै रोजी ५० हजारांच्या १, २ आणि ५ रुपयांच्या नाण्यांचा पहिला हप्ता बाजारात चलनात आणला.
यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक सोनी पिक्सता, सोनाजी बोबडे, रोहन विल्हा, रवींद्र पवार, सुहेल खेडेकर आणि स्वामी नारायण प्रोव्हीजन स्टोअर्सचे दिलीपशेट चौधरी, नवरंग स्वीटचे मुकेश बोराणा आदी मान्यवर उपस्थित होते.



