मुख्य बातमी

सेवा हक्क दिवस ; विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पाऊले उचलेन’

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ 

रत्नागिरी : ‘मी सेवा सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पाऊले उचलेन, सेवा हक्क दिवसानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांनी आज शपथ घेतली. सामान्य माणसाची सर्वांनी दखल घेऊन कमीत कमी कागदपत्रात त्याला कशी सुविधा देता येईल यासाठी सर्वांनी काम करावे. येत्या वर्षभरात घरपोच सुविधा, डिजिटल सुविधा देऊन राज्यात आपण आदर्श निर्माण करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात काल (२८ एप्रिल) सेवा हक्क दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्यासह विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी उपस्थितांना शपथ दिली.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, जिल्ह्यातील काही विभागांची कामगिरी कमी आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा अभ्यास करावा. त्यातील तरतुदी वाचाव्यात आणि आपली कामगिरी वाढवावी. शासनाच्या या अधिनियमानुसार सर्वसामान्य लोकांना सक्रीय सहभाग वाढवून सेवा द्याव्यात. ९८ टक्क्यांपेक्षा पुढे सर्व विभागांची कामगिरी हवी. सुमार कामगिरी करणाऱ्या विभागासाठी ५ हजार दंडाची तरतूद आहे, हेही लक्षात ठेवावे.

सेतू केंद्रामधून संवेदनशीलता हवी. जनतेला ताटकळत, रांगेत उभे राहायला लागू नये. त्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करु नये. देशाला विकसित, समृध्द बनवायचे असेल, तर सर्वसामान्य जनतेला सहज, सुलभ घर बसल्या सेवा कमीत कमी वेळेत, कमी कागदपत्रात उपलब्ध करून द्यायला हवी. त्यासाठी मानसिकता बदलावी, असेही ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या, सेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा देताना राज्यात प्रथम येण्याचे आव्हान सर्वच विभागानी स्वीकारावे. विहित कालावधीत ९८ टक्क्यांपेक्षा जास्त निर्गती व्हायला हवी. विहीत कालावधीत पारदर्शी सेवा नागरिकांना देण्यासाठी सर्वांनी कटिबध्द राहू.

अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी प्रास्ताविक केले. चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रशिस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिलकुमार माने, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर आदीसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!