मुख्य बातमीशैक्षणिक

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या एमबीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्नित एक प्रतिष्ठित आणि नामवंत महाविद्यालय असून, स्थापनेपासून आजपर्यंत अध्ययन, अध्यापन, संशोधन, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध अभ्यासानुवर्ती आणि अभ्यासेतर क्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. “नॅक” मूल्यांकनात महाविद्यालयाने सलग चार वेळा ‘अ’ श्रेणी प्राप्त केली असून याचीच परिणीती म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.) आणि मुंबई विद्यापीठाने ३१ मे २०२३ रोजी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा बहाल केला आणि १ जून २०२३ पासून महाविद्यालय स्वायत्त झाले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (बीपीए) आणि बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन (बीबीए) तर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून एमएससी (डेटा सायन्स) व मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) हे चार नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयात कला, वाणिज्य, शास्त्र या पारंपरिक विद्याशाखेतील अभ्यासक्रमांबरोबरच बॅचलर ऑफ अकाउन्टिंग ॲन्ड फायनान्स, माहिती-तंत्रज्ञानशास्त्र, संगणकशास्त्र असे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. महाविद्यालयीन स्तरावर बीबीए हा अभ्यासक्रम सुरू करणारे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील पहिले महाविद्यालय आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनपर सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाकडून प्रवेशपरीक्षेचे (सीईटी) आयोजन करण्यात येते. परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या एमबीए या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियादेखील वरीलप्रमाणे असून महाविद्यालयात १ ऑगस्ट, २०२५ पासून सुरू झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनपर सूचना आणि निकषांनुसार प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपरीक्षेत (सीईटी) मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता याद्या प्रदर्शित केल्या जाणार असून, सर्वसाधारणपणे प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. प्रवेशाची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून, या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांनी उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेश फेरीत प्रयत्न करावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमासंदर्भातील सर्व माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित केली जाणार असून, इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयाच्या https://gjcrtn.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी आणि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रा. स्वप्नील जोशी (मोबा. ९४०३३६१२००), प्रा. प्रविणा पिलणकर (मोबा. ९६७३०११९८५) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्ततेचा दर्जा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून सुरू करण्यात आलेल्या या सर्व अभ्यासक्रमांचा कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!